पुणे :
चांदणी चौकातील पाडण्यात येणाऱ्या पुलावर सोमवारपासून (ता. १२) ड्रिलिंगच्या कामास सुरवात झाली आहे. दोन ते तीन दिवस ड्रिलिंगचे काम चालणार आहे. यादरम्यान मुळशीहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक नव्या पुलावरून वळवली जाईल. मंगळवारपासून (ता. १३) प्रायोगिक स्तरावर हा बदल केला आहे. प्रशासन दोन ते तीन दिवस याच्यावर लक्ष ठेवून असेल. तीन दिवसानंतर पाडण्यात येणारा पूल बंद केला जाणार आहे. बंद कालावधीत त्यात स्फोटके भरण्याचे काम केले जाईल. त्यानंतर पूल पाडण्यात येईल.
चांदणी चौकातील पूल पाडण्याआधी महापालिकेच्या जलवाहिनी व विजेच्या तारा काढून टाकण्याचे काम सुरच आहे. या कामांना वेळ लागल्याने पूल पाडण्याच्या कामांना देखील विलंब होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मात्र आपल्या कामांना वेग दिला आहे. ड्रिलिंगचे काम दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. सोमवारपासून मुळशीहून साताऱ्याकडे जाणाऱ्या पुलावर मार्किंग करण्याच्या कामास सुरवात झाली. मार्किंगमुळे वाहनचालकांना वाहने कोणत्या दिशेने घेऊन जायचे याचा फायदा होणार आहे.
सध्या पुलावर ड्रिलिंगचे काम सुरू आहे. ड्रिलिंगचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. त्यानंतर जो पूल पाडण्यात येणार आहे, तो वाहतुकीसाठी बंद केला जाईल.
– संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे