तिरुअनंतपुरम :
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विजयासाठी मिळालेले 107 धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावत गाठले. धारदार गोलंदाजी करणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सामन्याचा मानकरी ठरला.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी सार्थ ठरवला. त्यांनी अवघ्या 2.3 षटकात दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाच गडी बाद केले. त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. ते अनुक्रमे 25 व 24 धावा करत बाद झाले. त्यानंतर आलेल्या केशव महाराजने 41 धावा करत संघाला शंभरी पार करून दिली. भारतासाठी अर्शदीपने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 107 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा खातेही न खोलता तंबूत परतला. अनुभव विराट कोहली यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील 3 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन षटकार ठोकत पटकन धावगती वाढवली. त्यानंतर मात्र राहुल व सूर्य कुमारने काही सांभाळून खेळ केला. नजर बसल्यानंतर मात्र त्यांनी चौकार षटकार ठोकत भारताचा विजय आवाक्यात आणला. सूर्यकुमारने यादरम्यान आपले 8 वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस राहुलने विजयी षटकारासह अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
https://twitter.com/BCCI/status/1575164824836882432?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1575164824836882432%7Ctwgr%5E546320dd07bcb1f7d782bf46979487f8c5a2ef6c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F