बालेवाडी :
बालेवाडी परिसरात पाण्याची समस्या, अपुरे रस्ते, फूटपाथची अनास्था, स्वच्छतेचे प्रश्न, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व सोसायट्यांनी “enough is enough आत्ता खुप झाले” अश्या अर्थाचे फलक लावण्याची मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील नागरिकांच्या संघटनांनी बालेवाडी फेडरेशन च्या मोहिमेला पाठींबा देण्यासाठी रविवारी बालेवाडीस भेट दिली.
यावेळी बालेवाडी वेल्फेर फेडरेशन चे अध्यक्ष रमेश रोकडे आणि बाणेर बालेवाडी पाषाण रहिवाशी संघटनेचे उपाध्यक्ष विकास कामत म्हणाले की सदर मोहीम कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्ती विरोधी नसून आमचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचावे म्हणून ही चळवळ सुरु केली आहे व यापुढे सोशल मिडिया द्वारा मोहीम चालू राहील असे सांगितले.
औंध विकास मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पाटकर यांनी पाठींबा देतांना सांगितले कि, नागरिकांचे प्रश्न नागरिकांनी मांडले पाहिजे, मोहल्ला कमेटी सभेचा प्रभावी वापर केला जावा. बाणेर पाषाण लिंक रोड रहिवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चतुर यांनी देखील पाठींबा देऊन सांगितले कि अशी चळवळ केल्या शिवाय प्रशासनाला जाग येणार नाही.
याच संघटनेचे रवींद्र सिन्हा यांनी त्रिसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली. मतदार नोंदणी, एरिया सभांचे आयोजन आणि नागरिकांचा जाहीरनामा. निवडणूका जाहीर झाल्यावर नागरिकांच्या मागणीचा जाहीरनामा प्रत्येक पक्षाला देण्यात यावा. उमेदवारांचे स्कोरकार्ड तयार करण्यात यावे.
पाषाण रहिवाशी संघटनेचे पुष्कर कुलकर्णी यांनी नद्यांच्या अवस्थेबद्दल सांगून पायाभूत सुविधा नसतांनाही मोठ्या प्रमाणवर बांधकामांना दिली जाणारी परवानगी यावर आवाज उठविला पाहिजे असे प्रतिपादन केले. फेडरेशनचे सदस्य सुदर्शन जगदाळे म्हणाले की नवीन होणारी सर्व बांधकामे विचारात घेऊन जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या यांचे काम प्रथम केले पाहिजे. परंतु सरकार, महापालिका असा विचार न करत केवळ सुशोभीकरण वगैरेंवर भर देते.
फेडरेशनचे सचिव मोरेश्वर बालवडकर यांनी सर्व संघटनाच्या पाठींब्या बद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी फेडरेशनचे सदस्य, नागरिक, पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.