विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई चा पराभव करून महाराष्ट्राने सलग तिसऱ्या विजयाची केली नोंद

0
slider_4552

रांची :

यशस्वी जैस्वालच्या (१४२) झुंजार शतकानंतरही मुंबईचा विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राकडून २१ धावांनी पराभव झाला. इ-गटातील या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २ बाद ३४२ अशी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात मुंबईचा डाव ४९ षटकांत ३२१ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे महाराष्ट्राने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली, तर मुंबईचा हा तीन सामन्यांत दुसरा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने दिमाखात सुरुवात केली. पवन शहा (१०४ चेंडूंत ८४ धावा) आणि राहुल त्रिपाठी (१३७ चेंडूंत नाबाद १५६) यांनी १८० धावांची सलामी दिली. पवनला मोहित अवस्थीने बाद केले. मात्र, त्रिपाठीने एक बाजी लावून धरताना कर्णधार अंकित बावणे (२८ चेंडूंत ३४) आणि अझीम काझी (३२ चेंडूंत नाबाद ५०) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदाऱ्या करत महाराष्ट्राला ३४२ धावांपर्यंत पोहोचवले. त्रिपाठीने स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक साकारताना १८ चौकार व दोन षटकार मारले.

मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईनेही आक्रमक सुरुवात केली. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने १३५ चेंडूंत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४२ धावांची खेळी साकारली. त्याला पृथ्वी शॉ (२५ चेंडूंत ३२), अरमान जाफर (३४ चेंडूंत ३६) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (४१ चेंडूंत ३१) यांची काहीशी साथ लाभली. मात्र, यानंतर सत्यजित बच्छावच्या (६/४६) डावखुऱ्या फिरकीपुढे मुंबईचा डाव गडगडला आणि त्यांचा पराभव झाला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ५० षटकांत २ बाद ३४२ (राहुल त्रिपाठी नाबाद १५६, पवन शहा ८४, अझीम काझी नाबाद ५०; शम्स मुलानी १/४३) विजयी वि. मुंबई : ४९ षटकांत सर्वबाद ३२१ (यशस्वी जैस्वाल १४२; सत्यजित बच्छाव ६/४६)

See also  शिखर धवन याने केल्या जलद दुसऱ्या क्रमांकाने ६००० धावा