बाणेर :
पाषाण-बाणेर टेकडीफोड विरोधात व टेकडी वाचवण्यासाठी पाषाण-बाणेर टेकडी बचाव नागरिक कृती समिती तर्फे रविवार दि. ११ डिसेंबर २२ ला नागरिकांना टेकडीफोड भागात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व पक्षीय मंडळी, विविध सामाजिक संघटना व पाषाण, बाणेर, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बावधन, सुस व म्हाळुंगे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आलेत. यात महिला व मुलांची संख्या लक्षणीय होती. या प्रसंगी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
पाषाण-बाणेर टेकडी स्मार्ट सिटी द्वारे २०१९ ला व्हेनेझिया सोसायटी हायवे ते पॅनकार्ड क्लब बाणेर भागात अंदाजे ३० ते ३५ फूट उंच व १०० मीटर लांब फोडली. नागरिकांनी त्यावेळेस त्यावर मोठया संख्येने टेकडीफोड जागेवर एकत्र येत आक्षेप नोंदवला. २० जुलै २०१९ ला औंध येथील पं. भिमसेन जोशी नाट्यगृहात स्मार्ट सिटी, पुणे मनपा, मनपा लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. यात तत्कालीन स्मार्ट सीटी सीईओ श्री. राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटी इंजिनियर यांनी टेकडी चुकीने फोडल्या गेली, टेकडीफोड ही चूक झाली हे सर्वांसमोर मान्य केले. स्मार्ट सिटी व पुणे मनपा यांनी याच बैठकीत (२०.७.२०१९) नागरिकांना आश्वस्त केले की टेकडी फोड ही चूक झाली, यापुढे टेकडी सोडून रस्ता करणार टेकडीला हात लावणार नाही.
नागरिकांनी त्यावेळेस त्यांचेवर विश्वास ठेवला व फोडलेली टेकडी पूर्ववत करा अशी मागणी केली.
टेकडी भविष्यात सुरक्षित राहावी यासाठी स्मार्ट सिटी मुख्याधिकारी व पुणे मनपा आयुक्त, तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अश्या आशयाचे सहा हजार (६,०००) नागरिकांच्या सह्याचे निवेदनही दिले.
मध्यंतरी टेकडीफोड भागात काही लोक राडारोडा टाकत होते त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाली. पुणे मनपाने ट्रॅप लावून राडारोडा टाकणाऱ्यांची वाहने जप्त केली व दंडही वसूल केला. टेकडी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे मनपाच्या या कारवाई बद्दल धन्यवाद.
परंतु दि. ७ डिसें. २०२२ ला असे लक्षात आले की याच टेकडीफोड भागात म्हणजे टेकडीवरून रस्त्याचे काम सुरू झाले. हे नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारे आहे. कुंपणच शेत खाते हेच म्हणावे लागेल. बाजूच्या विकसकांची एक इंचही जागा न घेता टेकडीवर घाला का? हे काम त्वरित थांबवण्यात यावे व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, राडारोडा टाकत अतिक्रमण करणाऱ्यांवर केली तशी. ही मागणी करत नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. २०१५ च्या शासकीय आदेशानुसार बिडीपी भागात टेकडीला कुठलीही इजा न पोहचवता टेकडीलगत मनपा आयुक्तांच्या परवानगीने फक्त ९ मीटर रस्ता करता येऊ शकतो. त्यासाठी डोंगत उताराची जागा १५ वर्षाआधीच घेतली असून काही अंतर ९ मिटर रस्तापण मागेच केलेला आहे. असे असताना इथे टेकडीफोड करत १८ मीटर रस्ता का व कोणासाठी? स्थानिक नागरिकांनी सुद्धा टेकडीफोड न करता असलेल्या जागेत ९ मीटर रस्ता करावा हेच सांगितले. कुणाचीही मागणी नसताना बिडीपी भागात टेकडीफोड करून इतका मोठा रस्ता कुणाच्या फायद्यासाठी हाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बाणेर बाजूची टेकडी यासाठी फक्त बिल्डरांना फायदा पोहचवण्यासाठी जागोजागी फोडली जाणार हे स्पष्टच दिसते.
श्री. व्ही. जी. कुलकर्णी पुणे मनपा पथ विभाग मुख्य व संबंधित अधिकाऱ्यांना टेकडीफोड भागात नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढावा म्हणून आज बोलाविण्यात आले होते परंतु त्यांनी त्याकडे पाठ फिरवली.
नागरिकांनी पाषाण-बाणेर टेकडी संदर्भात खालील मागण्या केल्या व तश्या आशयाचे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पुणे मनपा आयुक्त यांनाही देण्यात येणार आहे.
१. टेकडीफोड भागात टेकडीवरून सुरू असलेले रस्त्याचे काम त्वरित थांबवावे. टेकडी सोडून रस्ता करावा.
२. टेकडीवर रस्ता करत असलेल्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
३. टेकडीची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या उपस्थितीत मोजणी करून मार्किंग करण्यात यावे.
४. फोडलेली टेकडी पूर्ववत (Restore) करण्यात यावी.
५. भविष्यात टेकड्या (म्हणजे पुण्याची फुफ्फुसे) सुरक्षित राहतील यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी.
जागतिक तापमान वाढ व बदलते वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाने जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक निसर्ग जपत एक आदर्श निर्माण करावा. तसेच भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळावी ही नम्र विनंती नागरिकांतर्फे करण्यात आली.
तत्कालीन नगरसेविका सौ. ज्योती कळमकर यांचे पुणे मनपाला २२/७/१९ चे टेकडी वाचवण्यासबंधीचे पत्राचा हवाला देण्यात आला. तसेच माजी नगरसेविका सौ. स्वप्नालिताई सायकर यांनी जुलै २०१९ मनपा सभागृहात बेकायदेशीर टेकडीफोड, टेकडीसंदर्भात न्यायालयात बाणेर ग्रामस्थांची केस सुरू असताना टेकडीफोड व रस्त्याचे अतिक्रमण त्वरित थांबवण्यात यावे या मागणीची सभागृहातील क्लिप उपस्थितांसमोर ऐकविण्यात आली.
बेंगलुरू, हैद्राबाद, चेन्नई येथील जलस्त्रोत व निसर्ग संपवल्यामुळे झालेली वाताहत ताजी असताना, मुंबई व इतरत्र होणाऱ्या दरड कोसळी, सप्टेंबर २०१९ ला पुण्यात आंबील ओढ्यावरील अतिक्रमणामुळे ५० पेक्षा जास्त लोकांचे घेतलेले जीव हे सर्व ताजे असताना ही टेकडीफोड का? भविष्यातील माळीण व जीवितहानी टाळण्यासाठी गरज पडल्यास मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊ पण टेकडीला हात लावू देणार नाही ही ठाम भूमिका घेण्यात आली. श्री. प्रकाश दांडेकर, गौरव फडणवीस, राहुल कोकाटे, मधुकर दळवी, दीपक श्रोते, मोनाली शाह, यामिनी राठी, प्रल्हाद सायकर, अनिकेत मुरकुटे, आशिष कटके, मोहन हिंगडे, संजीव नाईक, सुरेश ससार, गोविंद भोईटे आदींनी आपली मते मांडली व पाषाण टेकडीला यापुढे कुठलीही इजा पोहचवली तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल व प्रसंगी न्यायालयीन लढाई पण लढावी लागली तर तेही केल्या जाईल, आमच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही देण्यात आला.