नागपूर :
संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील संत जगनाडे चौकात श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्वावर श्री. संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संतांच्या आध्यात्मिक विचारातून मानवी जीवन कसे बदलू शकते हे दिसून येते. ते केवळ संतच नव्हते तर समाजसुधारक होते. समाजातील चालीरिती बदलवून समाजातील विषमता दूर करून समाज पुढे गेला पाहिजे. संतांनी दिलेला विचार हा शाश्वत आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी संतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत जगनाडे महाराजांच्या सौदुंबरे या जन्मभूमी व कर्मभूमीचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूचे जतन करणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या माध्यमातून संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत आपणाला पोहोचावे लागतील. संत जगनाडे चौकातील हे स्मारक मोठ्या स्वरूपातील व्हावे यासाठी आमदार बावनकुळे आणि आमदार खोपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. या आर्ट गॅलरीसाठी लागणारा आवश्यक तो निधी मार्च 2023 पूर्वी उपलब्ध करून देणार.