पुणेरी पलटण ला नमवत जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी स्पर्धेत विजेता…

0
slider_4552

मुंबई :

प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाचं विजेतेपद जयपूर पिंक पँथर्सने पटकावलं आहे. मुंबईच्या NSCI मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या लढतीत जयपूरने ३३-२९ च्या फरकाने बाजी मारली.

प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद जयपूर पिंक पँथर्सने जिंकलं होतं. यानंतर चौथ्या हंगामात जयपूरचा संघ उप-विजेता ठरला होता. दुसरीकडे पुणेरी पलटणला अस्लम इनामदार आणि मोनू गोयत या दोन खेळाडूंची उणीव भासली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध खेळ करायला सुरुवात केली. जयपूरकडून अर्जुन देशवालने बोनस पॉईंट घेत आपल्या संघाचं खातं उघडलं. परंतु पुणेरी पलटणने पुढच्या काही मिनीटांमध्येच दमदार कमबॅक करत सामन्यात पुनरागमन केलं. पहिल्या सत्रात ८ मिनीटांनंतर दोन्ही संघांमध्ये रस्सीखेच सुरु होती. पुणेरी पलटणचा संघ या दरम्यान ५-४ अशी छोटेखानी आघाडी घेण्यात यशस्वी झाला होता. यानंतर जयपूरने पुण्याला बरोबरीत रोखण्यात यश मिळवलंही. परंतु पुढची काही मिनीटं हा सामना ८-८ असा बरोबरीत होता.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या चढाईपटूंना फारशी चमक दाखवता आली नाही, दोन्ही संघांकडून बचावफळीने सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. पुण्याचा कर्णधार फजल अत्राचली आणि त्याचा इराणी साथीदार मोहम्मद नबीबक्षने दोन सुरेख पकडी करत पुणेरी पलटण संघाला १०-८ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी पुढची काही मिनीटं कायम होती. परंतु जयपूरच्या अजितने एका चढाईत दोन गुणांची कमाई करत पहिल्या सत्राच्या उत्तरार्थात आपल्या संघाला १२-१० अशी आघाडी मिळवून दिली.

पुणेरी पलटणचा संघ सर्वबाद होण्याच्या वाटेवर आला असताना मॅटवर फक्त दोन खेळाडू शिल्लक होते. अशावेळी पुण्याकडून अबिनेश नंदराजनने अजितची पकड करत पुण्याची पिछाडी १३-१२ ने कमी केली. परंतु पहिलं सत्र संपायला शेवटची काही सेकंद बाकी असताना पुण्याचा पंकज मोहीते वॉक लाईन पार करायला विसरला. पंचांनी त्याची ही चूक बरोबर हेरून त्याला बाद करत जयपूरला एक गुण बहाल केला. ज्यामुळे मध्यांतरापर्यंत जयपूरच्या संघाने १४-१२ अशी दोन गुणांची आघाडी घेतली.

See also  लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी मात

दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणची झुंज फारकाळ टिकू शकली नाही. पुणेरी पलटणवर लोण चढवत जयपूर पिंक पँथर्सने सामन्यात दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला १८-१३ अशी आघाडी घेतली. परंतु पुणेरी पलटणने हार न मानता आपली झुंज सुरु ठेवली. गौरव खत्री आणि फजल अत्राचलीने बचावात घेतलेले गुण आणि आकाश शिंदेच्या मल्टी-पॉईंट रेडच्या जोरावर पुणेरी पलटणने आपली पिछाडी १७-१८ अशी कमी केली. पुणेरी पलटण कमबॅक करणार असं वाटत असतानात जयपूरने आकाश शिंदेला सुपरटॅकल करत सामन्यात आपली आघाडी कायम ठेवली.

जिवदान मिळाल्यानंतरही पुण्याच्या चढाईपटूंना आपली छाप पाडता आली नाही. जयपूर पिंक पँथर्सने सुरेथ बचावाच्या जोरावर सामन्यात २२-१७ अशी आघाडी घेत पुण्यावर पुन्हा एकदा ऑलआऊटची वेळ आणली. अशावेळी संघात बदली खेळाडू म्हणून आलेल्या आदित्य शिंदेने मल्टी पॉईंट रेड करत पुण्याला पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवला. फजल अत्राचलीनेही त्याला बचावात एक गुण घेत चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्राच्या मध्यांतरापर्यंत जयपूरचा संघ सामन्यात २५-२१ अशा आघाडीवर होता.

सामना संपायला अखेरची ५ मिनीटं बाकी असताना जयपूर पिंक पँथर्सने सामन्यावर आपली पकड आणखी मजबूत करायला घेतली. डू ऑर डाय रेडवर खेळत सामन्याची गती धिमी करत जयपूरने आपलं पारडं जड राखायला सुरुवात केली. दुसरीकडे पुणेरी पलटणला चढाईपटूंची निराशा चांगलीच भोवली. सामना संपायला शेवटचं मिनीट बाकी असताना पुणेरी पलटणनेच्या आदित्य शिंदेला पकडताना चुकीच्या पद्धतीने जर्सी ओढण्यात आल्यामुळे पुण्याला दोन गुण बहाल करण्यात आले. ज्यामुळे अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणने सामन्यात पुन्हा एकदा रंगत निर्माण केली. परंतु शेवटच्या चढाईपर्यंत जयपूरने संयम बाळगत सामन्यात ३३-२९ च्या फरकाने विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
https://twitter.com/ProKabaddi/status/1604141407152705537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1604141407152705537%7Ctwgr%5E5d3ad0cea58efc01b5f86618ec6f30ed4c121ac0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F