बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या इतिहासात आज अतिशय भाग्याचा दिवस होता. शाळेतील वार्षिक क्रीडा दिनाचे उदघाटन करण्यासाठी आज शाळेत, महाराष्ट्र केसरी २०२३ पैलवान शिवराज राक्षे यांचे आगमन झाले होते. त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी मुलांचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली, उपस्थित मान्यवरांनी क्रीडा साहित्याचे पूजन केले. इयत्ता ८ वी व ९ विच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर केले. मुलांमधील चपळता, समन्वय आणि समयसूचकतेचा कस लावणाऱ्या या क्रीडा प्रकाराची सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी खेळाच्या सर्व नियमांचे पालन करत खेळ खेळण्याची शपथ घेतली.
संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र बांदल सर यांनी शाल, श्रीफळ, भक्ती-शक्ती ची प्रतिमा तसेच 51000 ₹ देऊन श्री राक्षे यांचा सत्कार केला. “संस्थेने मला बोलवून माझा सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र बांदल सर यांचा आभारी आहे अशा शब्दात श्री शिवराज राक्षे यांनी संस्थेचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र चॅम्पियन योगेश धावडे, ओंकार दगडे आणि गणेश मोहोळ यांचाही सत्कार करण्यात आला.
खो खो मॅच चा टॉस महाराष्ट्र केसरी श्री शिवराज राक्षे यांच्या हस्ते करून पहिल्या मॅच ची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संदीप ढमढेरे, पैलवान नवनाथ राक्षे, अनिश मोहोळ, पैलवान शिवराज राक्षे, आग्रो आयडॉल कैलास जाधव, वस्ताद बाळासाहेब दांगट, पैलवान बाळू बोडके, संचालक यश बांदल आणि डायरेक्टर रेखा बांदल आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका रुचिरा खानवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक आदित्य पवार व श्रेयस गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचा हल्लूर यांनी अतिशय नेटकेपणाने केले.