ओरिसा :
ओरिसा येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (22 जानेवारी) यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान क्रॉस ओव्हर सामना खेळला गेला. उपांत्यपूर्व फेरीसाठी खेळला गेलेला हा सामना निर्धारित वेळेत 3-3 असा बरोबरीत सुटलेला.
त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. यासह यजमान भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
आपल्या गटात द्वितीय स्थानी राहिलेल्या भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. पहिल्या क्वार्ट मध्ये कोणताही गोल न झाल्याने भारताने आपले आक्रमण अधिक धारदार केले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ललित उपाध्याय याने भारताचे खाते उघडले. मात्र, न्यूझीलंडने लवकरच बरोबरी साधली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी आकाशदीप व वरूण यांनी गोल करत आघाडी 3-1 अशी केली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस रसेल याने गोल करत न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवले. चौथ्या हाफ मध्ये भारतासाठी श्रीजेश याने शानदार गोलकीपिंग केली. मात्र, फिंडलेने गोल करत सामना बरोबरीत आणला. उर्वरित सात मिनिटात कोणताही संघ गोल न करू शकल्याने सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.
पेनल्टी शूटआउटमध्ये दोन्ही संघांनी काही चुका केल्या. पहिल्या पाच स्ट्रोकवर सामना 3-3 असाच बरोबरीत होता. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक स्ट्रोक सत्कारणी लावला. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडू समशेर हा गोल करण्यात अपयशी ठरला व न्यूझीलंडच्या खेळाडूने पुढील संधी साधत संघाला विजय मिळवून दिला.
या पराभवामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आणखी पुढे गेले आहे. भारताने आपला पहिला आणि अखेरचा विश्वचषक 1975 मध्ये उंचावला होता.