तरुण पिढी म्हणजे बांधकाम क्षेत्राचे उज्ज्वल भवितव्य : सतीश मगर क्रेडाई महाराष्ट्रची युथ कॉन्क्लेव्ह उत्साहात संपन्न

0
slider_4552

पुणे :

“तरुण पिढीचा बांधकाम क्षेत्रातील सक्रिय सहभाग आश्वासक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशाग्रतेने वापर ही या पिढीची सर्वात जमेची बाजू असून यामुळे सकारात्मक बदल बांधकाम क्षेत्रात होताना दिसत आहेत. आधुनिकता आणि पारंपारिकता यातील उत्तम दुवा साधणारी ही पिढी म्हणजे बांधकाम क्षेत्राची केवळ गरज नव्हे उज्ज्वल भवितव्य आहे. ” अशा शब्दांत क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर यांनी उपस्थित तरुण उद्योजकांना प्रोत्साहित केले.

क्रेडाई-महाराष्ट्रची एकदिवसीय कॉन्क्लेव्ह नुकतीच येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेसाठी राज्याच्या ६२ शहरांतून संस्थेचे २०० हून अधिक सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, निमंत्रक अभिषेक भटेवरा, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे, निमंत्रक आशिष पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद खैरनार, सचिव सुनील कोतवाल आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजित नाईकनवरे देखील उपस्थित होते.

पुढे मगर म्हणाले की, ‘ युवा पिढीने बांधकाम क्षेत्रात काम करताना संयम, सचोटी आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. कोणतेही निर्णय घेताना सर्व नियम, कायदे यांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिला उद्योजिकांनी बांधकाम क्षेत्राकडेही दीर्घकालीन संधी म्हणून पाहावे. ‘

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आशिष पवार यांनी गेल्या दोन वर्षातील युथ विंगच्या कामाचा धावता आढावा घेतला. शांतीलाल कटारिया यांनी ‘येत्या काळातील संभाव्य समस्या’ यावर तर अनंत राजेगावकर यांनी ‘पुढील काळातील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर उपस्थितांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

रणजित नाईकनवरे व प्रमोद खैरनार यांनी देखील अनुक्रमे ‘बांधकाम व्यवसायातील संधी’ आणि ‘सिटी ब्रॅण्डिंग व सामाजिक बांधिलकी’ या संबंधी सविस्तर मत मांडले. सुनील फुरडे यांनी युथ विंगच्या टीमचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

डॉ. ऍड हर्षल सावला यांनी ‘बांधकाम व्यवसायात विपणनाच्या नवीन पद्धती’ समजावून सांगितल्या. डॉ. अनिल लांबा यांनी वित्त विषयक तर श्रावण हर्डीकर यांनी भारतीय प्रशासन सेवेसह नोंदणी व मुद्रांक संस्थेने चालू केलेल्या ई रजिस्ट्रेशन संबंधीच्या कार्यपद्धतीवर तरुणांना मार्गदर्शन केले. रोहित गेरा यांनी ‘बांधकाम व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर’ याविषयी उपयुक्त माहिती दिली.

See also  कमी खर्चात उत्तम क्षिक्षण मिळेल यासाठी शासन प्रयत्न करेल : चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राच्या वुमन्स विंगच्या निमंत्रक सपना राठी, उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, सहसचिव धर्मवीर भारती, संकेत तुपे, कुणाल दुद्दलवार, साहिल प्रभाळे व दिग्विजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्यामुळे तरुण बांधकाम उद्योजकांसाठी ही सभा फलदायी ठरली.