आयपीएस अधिकारी राजा माणगांवकर लिखित ‘सुसंवाद तनमनाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
slider_4552

पुणे :

ज्या पद्धतीने वाद्य आणि संगीत वेगळे उलगडून दाखविता येत नाही, त्याप्रमाणे मन आणि शरीर वेगवेगळे उलगडून दाखविता येत नाही. मनुष्याच्या अस्तित्वातच मनाचे स्वरूप दडलेले असते. मन आणि देव हे प्रत्येकाच्या जाणीवांच्या पातळीवर असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

आयपीएस अधिकारी राजा माणगांवकर लिखित ‘सुसंवाद तनमनाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आगाशे बोलत होते.

पाषाण येथील सेंटर फॉर पोलीस रिसर्चमध्ये झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष  आयपीएस अधिकारी सुधाकर आंबेडकर, प्रमुख अतिथी आयपीएस अधिकारी अशोक धिवरे, पुस्तकाचे लेखक आयपीएस अधिकारी राजा माणगांवकर, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंब एकत्र असूनही एकत्र नाही. मन, शरीर आणि अस्तित्व हे वेगवेगळ्या पातळ्यांवर असतात. प्रत्येक मन हा अभ्यासाचा विषय आहे. मनुष्याला कोणीतरी आपले ऐकून घेणारे हवे असते. पण असे ऐकून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मी जेव्हा मेडिकलला प्रवेश घेतला होता तेव्हा ते आर्ट ऑफ मेडिकल म्हणून ओळखले जात होते आणि मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा ते सायन्स ऑफ मेडिकल झाले होते .वैद्यकीय शास्त्र हे शारीरिक आणि मानसिक पातळ्यांवर समसमान प्रवास करीत असते. डॉक्टरांच्या केवळ उपस्थितीने आणि स्पर्शाने रूग्णाला बरे वाटत असते. डॉक्टरांचा तो स्पर्श शरीराचा असला तरी, तो मनाचा संवाद साधत असतो. अलीकडे मात्र तो संवाद तुटत चालला आहे.

यावेळी बोलताना सुधाकर आंबेडकर म्हणाले की, पोलीसांची आजपर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली, मात्र मन आणि तनाचा संवाद मांडणारे बहुदा हे पहिलेच पुस्तक असावे. हा विषय गंभीर आणि खोल आहे. पोलिसांना केवळ लाठीची भाषा आणि भ ची बाराखडी माहिती असते, असे असतांना माणगांवकरांनी मन या अकराव्या इंद्रियाला हाताळत पुस्तक लिहिले आहे हे कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. आमच्या या नोकरीच्या कालावधीमध्ये आम्हाला नाना प्रकारचे लोक भेटतात आणि अनुभव येतात. त्यावरून मनुष्य स्वभाव कसा असतो, तो किती मिश्रणांचा बनलेला असतो, याचे आम्ही नेहमीच साक्षीदार असतो.

See also  पुण्यातील चतु:शृंगी देवीच्या मंदिरात कोरोना नियम पाळत शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन.

यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, तन आणि मनाची सखोल तपासणी करताना मानवी जीवनाचा खरा अर्थ अधोरेखित करण्याचे आव्हान पुस्तकाचे लेखक राजा माणगांवकर यांनी चांगले पेलले आहे. संगीत, साहित्य, नृत्य कलेचा व्यासंग आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, तसेच कृषी परंपरेचे संस्कार यांचे महत्त्व त्यांनी आपल्या लेखनाव्दारे पटवून दिले आहे. तनामनाचा संवाद निसर्ग आणि संस्कृतीच्या सान्निध्यात अर्थपूर्ण होतो. संगीत, साहित्य आणि कलांच्या व्यासंगांनी तन आणि मनाला आनंद मिळतो. अशा विविध क्षेत्रातील मानदंडांची बेरीज ही वैश्विक कल्याणकारी असते. त्यामध्ये विश्वात्मक जगण्याचे मानवाचे सुख दडलेले असते.

यावेळी आयपीएस अधिकारी अशोक धिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तकाचे लेखक आयपीएस अधिकारी राजा माणगांवकर यांनी पुस्तक लेखना मागील भूमिका विशद केली. उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.