पुणे :
बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात होऊन चारजण ठार झाले आहेत.







ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. बस साताऱ्याकडून मुंबईकडे जात होती. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातात ट्रकचालकाचा देखील मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढलं. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
अपघात होऊन काही लोक अडकले आहेत अशी वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ०४ अग्निशमन वाहने व ०१ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून ०१ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ०७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.
बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवान वरील बाजूस जाऊन रश्शीचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणारया रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. अधिक माहिती घेतली असता, खाजगी बस एमएच ०३ सीपी ४४०९ निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती.
मालवाहतुक करणारा मोठा ट्रक एमएच १० सीआर १२२४ यामधे मोठ्या प्रमाणात साखरीची पोती असल्याचे समजले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.







