पुणे :
कै. विश्वास सणस स्मृती कबड्डी स्पर्धेत चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी, भैरवनाथ क्रीडा संस्था, बाणेर युवा संघ, महारूद्र सामाजिक संस्था, राकेशभाऊ घुले क्लब, बदामी हौद संघ, राणा प्रताप संघ, पुणे आणि भैरवनाथ संघ (भोसरी) यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवित आगेकूच केली आहे.
कै.विश्वास गुलाबराव सणस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरुष खुले गट स्पर्धांचे उद्घाटन पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे अत्यंत दिमाखात पार पडले. कात्रज दूध महासंघाचे संचालक श्री. गोपाळराव मस्के संचालक यांच्या शुभहस्ते सामन्यांना सुरुवात झाली. श्री. मस्के हे एक नावाजलेले राष्ट्रीय खेळाडू होते. हेच औचित्य साधून प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ करावयाचा असे ठरविले होते. सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. सायंकाळी सुरू झालेले सामने रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालू होते. प्रेक्षकांची भरघोस उपस्थिती शेवटपर्यंत होती. एकही मोठा प्रायोजक किंवा देणगीदार नसताना प्रतिष्ठानच्या आणि कै. विश्वास सणस यांच्या मित्रमंडळींनी स्पर्धेसाठी लागणारा संपूर्ण खर्च जमा केला ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असल्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांचे निराकरण पुढील स्पर्धेपासून संयोजन समिती नक्कीच करेल अशी ग्वाही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. काही कबड्डी प्रेमी मंडळींनी आणि काही जुन्या जाणत्या खेळाडूंनी पुढील स्पर्धेचे नियोजन यापेक्षाही छान कसे होईल याबद्दल काही सूचना केल्या आहेत. मंडळ त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. स्पर्धेचा अंदाजे खर्च अडीच ते तीन लाख एवढा होतो. स्पर्धेसाठी लागणारी रक्कम मोठ्या देणगीदारांकडून जमा करण्यापेक्षा अडीचशे ते तीनशे दानशूर व्यक्तींकडून प्रत्येकी एक हजार रुपये जरी घेतले तरी स्पर्धा उत्कृष्टपणे पार पडेल हे या स्पर्धेच्या निमित्ताने समजू शकते.