पुणे :
यंदाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे सुरू होत आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील ६ जून हा एक महत्त्वाचा दिवस होता. हा दिवस सर्व शिवभक्तांसाठी तितकाच महत्त्वाचा असल्याने मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिताचे प्रमुख मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी केले.
६ जून २०२३ ते ६ जून २०२४ असे शिवराज्यभिषकाचे वर्ष विविध लोकोपयोगी व ऐतिहासिक उपक्रमांनी साजरे केले जाईल. यासाठी व्यापक नियोजनासाठी पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व शिवभक्त यांच्या उदंड उत्साहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी युवराज संभाजी छत्रपती महाराज बोलत होते. बैठकीस महाराष्ट्रातील शिव भक्तांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
युवराज संभाजी छत्रपती म्हणाले, ३५० वा शिवराज्यभिषेक दिन हा जगभर पोहचेल आणि विश्ववंदनीय होईल, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. यावेळी त्यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावाही घेतला. बैठकीत पाणी, विद्युत पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, पार्किंग व शटल बस व्यवस्था, रोपवे स्वच्छता, निवास व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याची सविस्तर माहिती दिली.
शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या प्रमुख मार्गदर्शिका युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी यावेळी सर्व महोत्सव व्यवस्थापन कमिटीच्या प्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला. शिवभक्तांना शिवराज्यभिषेक महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते.
३५० सुवर्ण होणांचा अभिषेक –
चंदुकाका सराफ यांनी ३५० व्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत खास सोन्याचे ३५० सुवर्ण होण तयार केले असून, त्यांचा अभिषेक शिवमुर्तीवर करण्यात येणार आहे. याबद्दल चंदुकाका सराफ पेढीचे आभार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी मानले. सर्वांचे स्वागत समिती सदस्य अतुल चव्हाण यांनी केले. तर प्रास्ताविक अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. आभार कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी मानले.