चेन्नई :
आयपीएल 2023च्या प्लेऑफ सामन्यांना मंगळवारी (२३ मे) सुरुवात झाली. क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत ७ विकेट गमावत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ २० षटकांत १५७ धावांवर गारद झाला.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत १५७ धावांत आटोपला. या पराभवानंतर गुजरात टायटन्सला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात टायटन्स आता २६ मे रोजी दुसऱ्या क्वालिफायर सामना खेळेल.
१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात काही खास नव्हती आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी दोन गडी गमावले. आधी यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा बाद झाला, तो दीपक चहरच्या गोलंदाजीवर मथिशा पाथिरानाच्या हाती झेलबाद झाला. त्याचवेळी हार्दिक पांड्या ८ धावा करून महिष तिक्षानाच्या चेंडूवर जडेजाच्या हाती झेलबाद झाला. ४१ धावांवर दुसरी विकेट पडल्यानंतर दासून शनाका आणि सलामीवीर शुभमन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी झाली.
रवींद्र जडेजाने दासून शनाकाला (१७) बाद करून ही भागीदारी तोडली. शनाका बाद झाल्यानंतर सीएसकेने सामन्यावर पकड मिळवली. गुजरात गुजरातची धावसंख्या सहा विकेट्सवर ९८ धावा अशी झाली. येथून विजय शंकर आणि रशीद खान यांनी ३८ धावांची भर घालून गुजरातला सामन्यात परत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मथिशा पाथिरानाने शंकरला बाद करत ही भागीदारी तर फोडलीच, शिवाय सीएसकेचा विजयाचा मार्ग सुकर केला. रशीद खानच्या रुपाने नववी विकेट पडल्यावर सीएसकेचा विजय निश्चित झाला.
सीएसकेचा डाव
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेला दुसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडच्या रूपाने पहिला धक्का बसला असता, परंतु दर्शन नळकांडेचा तो चेंडू नो-बॉल ठरला. त्यावेळी ऋतुराज गायकवाड २ धावांवर खेळत होता. या लाइफलाइनचा पुरेपूर फायदा घेत गायकवाडने ४४ चेंडूत ६० धावांची खेळी केली, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मोहित शर्माने डेव्हिड मिलरला झेलबाद करून ऋतुराजचा डाव संपला. ऋतुराज आणि डेव्हन कॉनवे यांनी १०.३ षटकात ८७ धावांची भागीदारी केली.
ऋतुराज बाद झाल्यानंतर सीएसकेने नूर अहमदच्या गोलंदाजीवर शिवम दुबेची (१२) विकेट गमावली. यानंतर अजिंक्य रहाणे (१७ धावा, एक षटकार) आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ३१ धावांची भागीदारी केली. रहाणेला दर्शन नळकांडेने बाद केले, तर कॉनवे अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचा बळी ठरला. कॉनवेने ३४ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या.
यानंतर सीएसकेच्या विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली आणि त्यांनी अंबाती रायडू (१७), रवींद्र जडेजा तसेच कर्णधार एमएस धोनी (१) यांच्या विकेट्स गमावल्या. सततच्या धक्क्यांमुळे सीएसकेला ७ विकेट्सवर केवळ १७२ धावा करता आल्या. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर राशिद खान, दर्शन नळकांडे आणि नूर अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.