चंद्रपूर :
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केलाय.







चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.
युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
महाराष्ट्रात निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले.राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत.
किडनी स्टोनची शस्त्रक्रिया झाली होती
शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.
गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाईल. उद्या ३१ मे रोजी सकाळी 11 दरम्यान अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.








