बावधन येथे २२ एकरात साकारतेय वन्यप्राणी उपचार केंद्र

0
slider_4552

बावधन :

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी रस्त्यावर बावधन येथे 22 एकरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि आधुनिक वन्यप्राणी उपचार केंद्र (Transit Treatment Center) उभारले जात आहे. १ ऑगस्ट पासून ते सेवेत येत आहे. या केंद्रात ४०० वन्य प्राण्यांवर उपचाराची सोय असल्याने हे केंद्र पुणे विभागात सर्वात मोठे वन्य प्राण्यांचे हॉस्पिटल ठरणार आहे.

रस्ता ओलांडताना वाहनाचीधडक बसणे, मानवी हल्ल्यात स्वबचाव करताना जखमी होणे, अन्न-पाणी न मिळाल्याने अशक्तपणा येणे, आजारी पडणे, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणे, कायमस्वरूपी अपंगत्व येणे, मांजामध्ये कापले जाणे, विजेचा धक्का बसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जखमी झालेले वन्यप्राणी या केंद्रात आणले जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार करून जे प्राणी निसर्गात राहण्यासाठी सक्षम असतील त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

सध्या अशा जखमी प्राण्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. जुन्नरमधील बिबट्यांसाठी वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्र काही वर्षांपूर्वी सुरु केले आहे. तिथे केवळ बिबट्यावरच उपचार केले जातात. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राणी बचाव केंद्र, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या संस्थांमध्ये जखमी प्राण्यांवर उपचार केले जात होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. मात्र या केंद्राच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड झाली नव्हती. मागील आठवड्यात एका संस्थेची निवड झाली असून या संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासून बावधन येथील प्राणी रुग्णालयात पूर्ण क्षमतेने काम सुरु केले जाणार आहे.

*वन्यप्राणी उपचार केंद्रातील विभाग*

प्रशासकीय इमारत

पशुवैद्यकीय रुग्णालय

मार्जार कुळातील प्राणी

कुत्रावर्गीय प्राणी

तृणभक्षी वन्यप्राणी

सस्तन प्राणी

सरपटणारे प्राणी

पक्षी विभाग

वन्यप्राणी शवविच्छेदन कक्ष

See also  कोथरूडजवळील चांदणी चौकात बसला भीषण आग सर्व प्रवासी सुखरूप..