मुंबई :
राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमधून खासगी वाहनांना वगळावं, अशी मागणी शिंदे सरकारकडे केली. ‘जनता रोड टॅक्स देते, मग टोलचा भार कशाला, असा रोखठोक सवाल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांचा भाडीमार शिंदे सरकारला केला. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का आहे? तसेच महिलांसाठी शौचालय का नाही, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. रस्त्यांच्या अवस्थेवरही राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला.
*टोल माफी होणार का?*
राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीओ विभागाच्या ठाणे पासिंग असलेल्या MH 04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करण्याचा विचार सुरु आहे. याबाबत लवकर निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
*बैठकीत पोलिसांच्या घरांबाबत चर्चा*
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अजून एका महत्वाचा मुद्द्यावर चर्चा झाली. ३३ अ योजनेअंतर्गत पूर्ण राज्यभरातील पोलिसांना हक्काची घरं मिळण्याबाबत चर्चा झाली. पोलिसांना १५ हजार घरे देण्याची मागणी ठाकरेंनी यावेळी केली.