गोवा मुक्ती संग्रामाची स्मृती जागविणारा हेरिटेज वॉक

0
slider_4552

पुणे :

गोवा मुक्ती संग्रामाची स्मृती जागविणारा हेरिटेज वॉक २३ डिसेंबर, शनिवार रोजी सकाळी १० वाजता ‘नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड’ येथे आयोजित केला आहे. ऑलिव्ह ग्रीन व्हेन्चर फाऊंडेशन याचे संचालक निवृत्त कर्नल अवधूत ढमढेरे आणि इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री या युद्ध स्मारकाबद्दल अधिक माहिती या हेरिटेज वॉक मध्ये देणार आहेत.

बीव्हीजी इंडिया लिमिटेड, क्लब हेरिटेज आणि एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा वॉक आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स या वॉकचा मिडिया पार्टनर असणार आहे.

हे मेमोरियल संपूर्ण दक्षिण आशियातील पहिले युद्ध स्मारक आहे की जे सामान्य लोकांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. या युद्ध स्मारकाचे दोन भाग आहेत. भारतीय स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत जेवढी युद्धे झाली त्या युद्धांचा इतिहास दाखविणारे चित्रफलक आणि दुसरा भाग म्हणजे सदर्न कमांड म्युझियम. आपल्या सशस्त्र दलांनी जी साहसी कामगिरी केलेली आहे तिची स्मृती जागविण्यासाठी युद्ध नौकांच्या प्रतिकृती, विजयंता रणगाडा आणि मिग – २३ या विमानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 1947 पासून सशस्त्र सेना दलांचा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या परमवीर चक्र पदक विजेत्या 21 वीरांचे पुतळे आपल्याला येथे बघता येतात. त्याशिवाय 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त करताना जो संग्राम झाला त्याची काही छायाचित्रे आपल्याला येथे बघता येतात.

1962, 1966, 1971 आणि 1999 या युद्धात झालेल्या काही संस्मरणीय लढाया आपल्याला येथे चित्ररूपात बघता येतात. सदर्न कमांड वस्तू संग्रहालयात आपल्याला सैन्य दलाच्या वापरात असलेले विविध प्रकारचे युद्ध साहित्य जसे भूसुरुंग, रणगाडा भेदी सुरुंग, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा, विविध प्रकारचे रणगाडे आणि चिलखती गाड्या आपल्याला या ठिकाणी बघता येतील. भारतीय सशस्त्र दलांचा आतापर्यंतचा चित्ररूप इतिहास आपल्याला येथे बघता येईल. भारतीय सैनिकांची पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील कामगिरी, श्रीलंकेतील शांती सेना, कांगो येथील शांती सेना यामध्ये जी कामगिरी केली त्याची छायाचित्रे येथे बघता येतात. भारतात असलेल्या सर्व युद्ध स्मारकांचे माहिती फोटो आणि अनेक वीरांबद्दलची माहिती आपल्याला येथे सहजपणे घेता येते.

See also  रयत शिक्षण संस्थेने स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे - खासदार शरद पवार

हा हेरिटेज वॉक सशुल्क असून युद्ध स्मारकाचे प्रवेश मूल्य वीस रुपये आहे. अधिक माहितीसाठी श्री. उमेश पोटे (९७६२०९२३३२) यांच्याशी संपर्क साधावा.