पुणे :
मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून 11 दिवसांनी म्हणजेच 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मनुष्यबळ व्यवस्थापन आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 1 हजार 704 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात तर मावळची यंत्रे बालेवाडीतील क्रीडा संकुलात आणि शिरूरची मतदान यंत्रे रांजणगाव एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी टेबलांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला टपाली आणि लष्करी जवानांचे ईटीपीबीएसद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदारसंघांसाठी मिळून 44 टेबल स्थापन असणार आहेत. मतदान यंत्रांच्या मोजणीसाठी 372 टेबलवर 1 हजार 626 अधिकारी, कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे. अतिरिक्त 30 टक्के मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे.
मतमोजणीसाठी नियुक्ती झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेला होणाऱ्या सुरुवातीपासून, मतदान यंत्रांचे व्यवस्थापन, सूचना आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार येणार आहे. मतमोजणीचे टप्पेनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची सरमिसळ होणार आहे.