पुणे :
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून होणारी वाहतूक कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे रिंगरोड हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या निविदा उघडण्यात आल्या. नऊ पॅकेजसाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या असून निवडणूक रोखे प्रकरणात आघाडीवर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा देखील समावेश आहे. रिंगरोडच्या कामाला जून महिन्यात सुरुवात होईल अशी शक्यता आहे.
त्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग, नवयुग इंजिनिअरिंग या कंपन्या नऊ पॅकेज पैकी प्रत्येकी तीन असे सहा पॅकेजमध्ये सर्वात कमी रकमेच्या निविदा भरल्या आहेत. तर उर्वरित तीन पॅकेजमध्ये पीएमसी इन्फ्रा, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा आणि जीआर इन्फ्रा या कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
एमएसआरडीसीने पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांमध्ये पुणे रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. या रिंगरोडची लांबी 127 किलोमीटर आहे. तर रुंदी 110 मीटर आहे. दोन टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम होणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे सुमारे 80 टक्के भूसंपादन झाले आहे. पश्चिम भागातील रस्त्यासाठी पाच पॅकेज करण्यात आले आहेत.
पूर्व भागासाठी सुमारे 70 टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले आहे. पूर्व भागातील रस्त्यासाठी चार पॅकेज करण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम देण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा भरण्याची अंतिम मुदत 16 एप्रिल पर्यंत होती. त्यानंतर या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या.
रिंगरोडच्या कामासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये निविदांची छाननी होईल. त्यामुळे जूनमध्ये रिंगरोडच्या कामाला सुरुवात होईल, असे म्हटले जात हे.