पंढरपूर :
पंढरपूर येथील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज (साेमवार) पाण्याची गळती लागल्याचे चित्र हाेते. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात स्लॅबचे पाणी गळू लागले आहे. यामुळे भाविकांत नाराजी पसरली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बाेलताना मंदिर संस्थानने मंदिरात लवकरच वॉटरप्रूफिंगचे कामही सुरु केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
पंढपूर येथील विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा, रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपू लागले. या विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी मंदिरात गळत असल्याने भाविकातून नाराजी व्यक्त करण्यात आली.
*गळतीवर उपाययोजना केल्या जातील : मंदिर समिती*
याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, मागील चार दिवसांपासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सूरू आहे. अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपले आहे. लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी ग्वाही देखील विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.