पुणे :
पुणे, सातारा जिल्ह्यासह राज्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. मॉन्सूनचा ट्रफ सध्या सक्रीय असून तो सर्वसाधारण जागेच्या दक्षिणेकडे झुकलेला आहे. या ट्रफ पुढील चार ते पाच दिवस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काही भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मॉन्सूनचा ट्रफ यासह दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. झारखंड आणि शेजारील भागात तसेच अरबी समुद्र व सौराष्ट्र् या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पड़त आहे.
बुधवारी (दि.31 ) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा , नागपूर, चंद्रपूर,गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 1) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.
तर शुक्रवारी (दि. 2) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी (दि. 3) कोकण विभागासह पुणे, सातारा, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे.