पुणे :
टीका, टिप्पणी आरोप सहन केले जाईल.परंतु, बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे, असा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडसावले.







महाळुंगे बालेवाडीत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी बाकीच्या कशाचाही नाद करावा. पण, लाडकी बहिण योजनेच्या विषयात नाद करु नये. हे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना सांगतो. रक्षाबंधनाच्या अगोदर महिलांच्या खात्यावर पैसे पोहोचले पाहिजे हे दिलेले वचन पूर्ण केले. लाडक्या बहिणीच्या रुपाने लाखो बहिणी मिळाल्या. बहिणींची माया, आशिर्वाद माया, प्रेरणा, उर्जा देणारे आहेत. संघर्ष करुन आम्ही इथपर्यंत आलो आहोत. या शक्तीच्या जोरावार अनेकांना पुरुन उरलो आहोत. सावत्र, कपटी भावांवर मात करुन आलो आहे. त्यांना त्यांची जागा दाखवा. ही योजना कशी बारगळेल, फसेल, विकत घेता का अशी काहीही बोलत आहेत.
सत्तेचा उपयोग स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी करत नाही. सतत जनतेसाठी काम करत आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून एकही दिवस घरी थांबलो नाही. केवळ तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुकवरुन बडबड केली नाही. झेंडू बामपण कमी पडेल असे दुखणे विरोधकांना झाले आहे. हे देणारे सरकार असून घेणारे नाही. आम्ही देत राहणार आहोत. दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा अहेर मिळणार आहे. विरोधकांसाठी दीड हजारांची रकम किरकोळ असेल कारण त्यांनी गरिबीचे चटके कधी सोसले नाहीत. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. एक रुपया तरी महिलांच्या खात्यावर टाकले का, काँग्रेसचे सरकार असते तर महिलांच्या खात्यावर 15 रुपयेही आले नसते. परंतु, आम्ही थेट खात्यात पैसे टाकले.







