मुंबई :
विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका 26 नोव्हेंबर पूर्वीच पार पडतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.







केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेतली. लोकांना मते देताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे मतदार फोन घेऊन येतात त्यांना तो सोडून जाताना आणि परत नेताना अडचणी येतात. त्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखण्याचीही विनंती केली.
वृद्ध लोकांच्या येण्याची-जाण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पोलिंग एजंट हा स्थानिक असावा अशीही विनंती राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष 4.59 कोटी मतदार आहेत. तर महिला 4.64 कोटी आहेत.
आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. 19.48 लाख मतदार हे नवमतदार असल्याचेही राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने राजकीय चिन्हांबाबत आधीच निर्णय दिलेले आहेत. ज्या पक्षांचे दोन गट आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इतर चिन्ह दिले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांच्या चिन्हाबाबत आताच काही सांगू शकत नाही, असेही कुमार म्हणाले.








