चाकण :
देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसी आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे सुमारे २० लघुउद्योग (MSMEs) एमआयडीसीबाहेर स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. या उद्योगांनी स्थलांतर केल्यास परिसराच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे चार हजार रोजगार धोक्यात येण्याची शक्यता उद्योग प्रतिनिधींनी वर्तवली आहे.






बुधवारी (ता. १२) चाकणमधील उद्योजकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी ‘प्रमिला उद्योग सहकारी सोसायटी’चे अध्यक्ष शंतनू कुलकर्णी, उपाध्यक्ष धनंजय शेडबाळे, ‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’चे मुख्य अधिकारी दिलीप बटवाल, ‘चाकण नागरी कृती समिती’चे कुणाल कड व प्रशांत टोपे आणि ‘चाकण इंडस्ट्रिअल असोसिएशन’चे अध्यक्ष जयदीप अक्कलकोटे उपस्थित होते.
उद्योगांसमोरील प्रमुख अडचणी
रस्त्यांची दुरवस्था: एमआयडीसीतील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांपैकी जवळपास निम्म्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहतूक कोंडी: अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या ट्रक्समुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
वेळापत्रक विस्कळीत: वाहतूक कोंडीमुळे कामगारांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कच्चा आणि तयार मालाच्या वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
ऑटो हब’चा दर्जा गमावण्याचा धोका
पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे गेल्या काही वर्षांत ५० हून अधिक उद्योग गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आधीच स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे चाकणचा ‘प्रमुख ऑटो हब’ हा दर्जा गमावण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. “पाच किलोमीटरचे अंतर कापायला दोन तास लागत असतील, तर ती केवळ प्रवासाची समस्या राहत नाही, ती उत्पादन आणि रोजगाराची समस्या बनते. पायाभूत सुविधा अपयशी ठरल्यास गुंतवणूक बाहेर जाते,” अशी खंत दिलीप बटवाल यांनी व्यक्त केली.
समन्वयासाठी ‘नोडल अधिकारी’ नेमावा
विविध सरकारी संस्थांमध्ये अंतर्गत समन्वय नसल्याचा मोठा फटका उद्योगांना बसत आहे. पीएमआरडीए (PMRDA), जिल्हाधिकारी कार्यालय, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश असलेली एक ‘संयुक्त आढावा समिती’ स्थापन करावी आणि या सर्वांशी समन्वय साधण्यासाठी एका ‘नोडल अधिकाऱ्याची’ नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी उद्योजकांनी केली आहे.
उद्योग प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या:
# गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये (Golden Hour) रुग्णालयात पोहोचता यावे यासाठी रस्ते मोकळे असावेत.
# विद्यार्थी वाहतुकीसाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात.
# खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
# मान्सूनपूर्व देखभालीसाठी विशेष ‘चाकण रोड सेल’ची स्थापना करावी.
# परिसरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे कमी करावीत.
# कामगार आणि उद्योगांच्या सुरक्षिततेसाठी # योग्य पायाभूत सुविधा पुरवाव्यात.
# एमआयडीसी परिसरात पुरेसा वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा.








