अलिबाग :
पावसाळ्यात अतिवृष्टी आणि दरडी कोसळल्यामुळे महिनाभर बंद ठेवावा लागलेल्या ताम्हिणी घाटातील धोकादायक मार्गाला पर्याय म्हणून १० किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामाच्या प्रकल्प अहवालाचे (DPR) काम सध्या सुरू असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग विभागामार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत दिली.






या पत्रकार परिषदेला आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद अमित नाईक उपस्थित होते.
पर्यटन व स्थानिक रोजगाराला दिलासा मिळणार
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग जवळपास महिनाभर वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प होता. या मार्गबंदीमुळे ताम्हिणी घाटातील पर्यटन पूर्णपणे थप्प झाले असून, पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या शेकडो स्थानिक व्यावसायिकांचे आणि रोजगाराचे मोठे नुकसान झाले. प्रस्तावित बोगदा साकारल्यास पावसाळ्यातील वाहतुकीचे अडथळे दूर होऊन प्रवासाचा वेळ वाचेल आणि स्थानिक लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल.
पत्रकार परिषदेतील इतर महत्त्वाच्या घोषणा:
* ४ रेल्वे उड्डाणपूल: ‘महारेल’ (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) अंतर्गत कर्जत येथे ३ आणि नागोठणे येथे १ अशा एकूण चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. सुमारे ४५० कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे लवकरच सुरू होतील.
* माणगाव बायपास: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची (बायपास) एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन असून काम वेगाने सुरू आहे.
* टोलनाक्याला स्थगिती: मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड येथील पथकर (टोल) नाक्याला स्थगिती मिळाली आहे.








