सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचनं मिळवलं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं अजिंक्यपद !

0
slider_4552

ऑस्ट्रेलिया :

सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं.अंतिम फेरीत त्यानं रशियाच्या दानिल मेदवेदेव्हवर 7-5, 6-2, 6-2 अशी मात केली.

जोकोविचनं तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे. आजवर सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम जोकोविचच्याच नावावर आहे.

जोकोविचचं हे कारकीर्दीतलं एकूण अठरावं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.ऑस्ट्रेलियन ओपनमधल्या नऊ विजयांशिवाय जोकोविचनं आजवर पाच वेळा विम्बल्डन, तीन वेळा यूएस ओपन आणि एकदा फ्रेन्च ओपन जिंकलं होतं.टेनिसच्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या बाबतीत जोकोविच जगात तिसऱ्या स्थानावर आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांच्या खात्यात प्रत्येकी वीस ग्रँड स्लॅम विजेतेपदं आहेत.

असा रंगला सामना

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचला चौथ्या स्थानावर असलेला दानिल मेदवेदेव्ह कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा होती. अगदी तशीच या सामन्याची सुरुवात झाली.पण नंतर दबावाखाली खेळताना मेदवेदेव्हनं केलेल्या चुका त्याला भोवल्या. पहिला सेट जिंकण्यासाठी जोकोविचला झुंजावं लागलं. पण दुसरा सेट त्यानं काहीसा सहजपणे जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव्हनं झुंज दिली. पण तोवर सामना त्याच्या हातून निसटला होता.

See also  अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीकर भारतने बेंगलोरला मिळवून दिला विजय