डे नाईटस कसोटीच्या आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज .

0
slider_4552

अहमदाबाद :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या कसोटीला बुधवारपासून सुरुवात होणार असून हा सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यावर दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. त्यामुळे भारताला हा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवण्याची संधी आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममधील हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. हे स्टेडियम १९८३ मध्ये बांधण्यात आले होते आणि २००६ रिनोव्हेट करण्यात आले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये काही आंतरराष्ट्रीय सामने झाले. भारताने या स्टेडियममध्ये अखेरचा कसोटी सामना २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच खेळला. चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने या कसोटीत ९ विकेट राखून बाजी मारली होती. परंतु, त्यानंतर २०१५ मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे नव्याने बांधण्याचे ठरवण्यात आले आणि याचे काम मागील वर्षी पूर्ण झाले.

सरदार पटेल स्टेडियम हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून याची आसनसंख्या १ लाख १० हजार इतकी आहे. कोरोनामुळे या सामन्यासाठी आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. भारतीय संघाला केवळ दोन, तर इंग्लंडला तीन डे-नाईट कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. मात्र, इंग्लंडने परदेशात दोन डे-नाईट कसोटी सामने खेळले असून हे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

See also  महिलांचे आयपीएल लवकरच सुरू होणार !