मराठा आरक्षणाचा कायदा कराच’, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती

0
slider_4552

मुंबई :

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा  निर्णय रद्द केला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, ‘मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा’ अशी हात जोडून विनंतीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ‘महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे.

महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारने निर्णय घेतला. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितले गेले, हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झाले’ असंही ठाकरे म्हणाले.

‘आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसंच 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्राने तत्पर निर्णय घेवून न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’ अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींनी केली.

‘छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत. त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मा. पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

See also  मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर सुरक्षित वाटत : कंगनाचे ट्वीट.

‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.