पुणे :
कंपनी कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या चालकासह दोघांना खंडणीविरोधी पथकाने रंगेहात पकडले. अजुहरद्दीन शेख (24, रा. शाहूनगर, चिंचवड, मूळ- पश्चिम बंगाल) आणि संतोष देवकर (32, शाहूनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार कंपनी कन्स्ट्रक्शनचे व्यावसायिक आहेत. 16 जूनला एका अज्ञात व्यक्तिने त्यांना फोन करून ’50 लाख रुपये दे, पोलिसांना माहिती दिली तर कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिली.’ त्यानुसार तक्रारदाराने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. पथकाने तांत्रिक माहितीनुसार औंध येथे सापळा रचून 50 लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या अजुहरद्दीनला ताब्यात घेतले. त्याला खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या संतोष देवकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपी संतोष तक्रारदार यांचा चालक म्हणून कामाला असल्याचे उघडकीस आले. 2016 मध्ये त्याने काम सोडल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली होती. स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी आरोपी संतोषने पूर्वीच्या मालकाकडे खंडणी मागण्याचा डाव आखला. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू होता. आज पुन्हा आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला व 50 लाख रुपये घेऊन औंध भागात बोलावले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तक्रारदार यांना पैसे घेऊन ज्याठिकाणी बोलावले तेथे पाठविले. त्यानंतर अजुहरद्दीन शेख हा पैसे घेत असताना त्याला पथकाने छापा टाकून रंगेहात पकडले. त्यानुसार त्याने अजुहरद्दीनला साथीला घेऊन मालकाकडे 50 लाख रुपये मागण्यास प्रवृत्त केले असल्याची कबुली दिली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळूखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार,
मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.