कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालल्याचे दिलासादायक चित्र असताना आता विषाणूच्या ‘डेल्टा प्लस’ नामक स्वरूपामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. देशात सध्या कोरोनाच्या या स्वरूपाची लागण झालेले फक्त 22 रुग्ण आहेत. मात्र हा व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरू शकतो, हा धोका लक्षात घेता या स्वरूपाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट सध्या 9 देशांमध्ये आढळला आहे. यात भारतासह ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीनचा समावेश आहे. देशात सर्वप्रथम आढळलेले डेल्टा स्वरूप हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार मानले जात असताना आता ‘डेल्टा प्लस’चे संकट उभे राहिले आहे.
देशात या स्वरूपाची लागण झालेले फक्त 22 रुग्ण आहेत. यांपैकी 16 रुग्ण महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव येथे आढळले आहेत. तर उर्वरित रुग्ण मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यातील आहेत. या स्वरूपाचा सामना करण्यासाठी राज्यांना पत्र पाठविण्यात आले असल्याचे भूषण यांनी सांगितले. सध्यातरी या स्वरूपाला चिंतेच्या श्रेणीऐवजी ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पण संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी हा व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी यावेळी विषाणूच्या वर्तनावर प्रकाश टाकला. विषाणू अद्यापही फिरत असल्याने नवी लाट येत असते. जर कोरोनासंबंधीच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही तर त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. विषाणूमध्ये होत असलेले बदल हा चिंतेचा विषय आहे. पण याबाबत आताच भाकित करणे शक्य नसल्याचे पॉल म्हणाले. लसीकरणाच्या माध्यमातून त्याला थोपवले जावू शकते. जर विषाणूला हल्ला करण्याची संधी नाही दिली तर अडचण येणार नाही, असे नमूद करत पॉल यांनी आतापर्यंत अनेक देशांमध्ये चार लाटा आल्याचे सांगितले.
मात्र कोरोनांच्या लाटांबाबत ठोस असा कुठलाही नियम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डेल्टा स्वरूपावर कोव्हिशील्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी प्रभावी असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे. डेल्टा व्हेरिएंटचे 80 देशांमध्ये रुग्ण आढळले असल्याने तो ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’च्या श्रेणीत टाकण्यात आला आहे