बालेवाडी :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी 2018 साली ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना हे महत्वपूर्ण पाऊल टाकले. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश तात्या बालवडकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा सदस्य मयुरी प्रणव बालवडकर यांच्या माध्यमातून बाणेर – बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी या योजनेचे कार्ड मोफत काढून देण्याचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली असुन नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पोचविण्याचा उद्देश लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.
पात्र नागरिकांसाठी दि. १० जुलै ते १३ जुलै सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश बालवडकर यांनी केले आहे.