मुळशी :
मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि मुळशी दैनिकचे संपादक ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय नारायण सुर्वे (वय ५७) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या( दि.13 )रोजी जामगाव ता.मुळशी येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना मुळशी तालुका प्रमुख, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते. विविध पदांवर काम करताना त्यांनी मुळशी तालुक्यातील तहसीलदार कचेरी, पंचायत समिती इमारत, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, न्यायालय इमारत, पौड एसटी स्टँड, ताम्हिणी घाट, मुळशी, वरसगाव टेमघर धरणग्रस्त यांचे प्रश्न सातत्याने मांडले. ती सोडविण्यासाठी आंदोलने केली. धरणातील लॉंच सेवा, एसटी सेवा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले.
मुळशी धरण शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य राहिले. माजी आमदार शरद ढमाले यांचे ते इयत्ता पाचवी पासूनचे वर्गमित्र, संपूर्ण जिल्ह्यात त्यांची जोडी प्रसिद्ध झाली. तालुक्याच्या विकासासाठी अखेर पर्यंत त्याची पाठपुरावा सुरू होता. मुळशी दिनांक हा गेली 30 वर्षाहून अधिक काळ आज अखेर सुरू होते. मुळशी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य, राज्यातील पहिले तालुका पातळीवरील पत्रकार भवन उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवतेज हा त्यांचा दिवाळी अंक आणि शिवमार्ग मासिक या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्न मांडताना मुळशी तालुका आणि कोथरूड परिसरात वेगळा ठसा उमटवला. दैनिक सामना, पुढारीचे मुळशी बातमीदार म्हणूनही त्यांनी काम केले होते.