मुंबई :
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती होणार अश्या चर्चांना उधाण आलं होतं. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांनी वृत्तांशी बोलताना ‘आमची भेट वेगळ्या कारणांसाठी झाली होती, मी राष्ट्रपती व्हावे यासाठी नाही. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. 2024च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही’, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल (१३ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.