भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. अव्वल सीडेड विनेशला यंदा पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला आणि तिचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यातच भारतीय कुस्ती फेडरेशनने (WFI) ऑलिम्पिकदरम्यान बेशिस्त वर्तणुकीचा ठपका विनेशवर ठेवला आहे. भारताने टोकियोमध्ये सात पदके जिंकताना ऑलिम्पिक स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरी केली. परंतु, त्याच वेळी सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अपयश आल्याने विनेश निराश असून पुन्हा कुस्ती खेळण्याबाबत साशंक आहे.
मानसिकदृष्ट्या मी खचले आहे
भारतामध्ये तुमच्या चांगल्या कामगिरीचे जितके कौतुक होते, त्यापेक्षा तुम्ही अपयशी ठरल्यास तुमच्यावर जास्त टीका होते.
तुम्हाला एकदाही पदक जिंकण्यात अपयश आले, तर लोक तुमची सर्व कामगिरी विसरून जातात. मी कुस्ती खेळण्यास पुन्हा कधी सुरुवात करणार हे सांगणे अवघड आहे. कदाचित मी पुनरागमन करणारही नाही. माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि बहुधा तेच माझ्या हिताचे होते. आता मी शारीरिकदृष्ट्या फिट आहे. परंतु, मानसिकदृष्ट्या मी खचले आहे, असे विनेश एका मुलाखतीत म्हणाली.
भारतात खेळाडूंना कठोर वागणूक
अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सने मानसिक आरोग्यामुळे ऑलिम्पिकमधील काही स्पर्धांमधून माघार घेतली. लोकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले. परंतु, हीच गोष्ट भारतीय खेळाडूबाबत घडली तर? एखाद्या स्पर्धेसाठी मानसिकदृष्ट्या तयार नसल्याने भारतीय खेळाडूने माघार घेतल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटले असते, असेही विनेशने नमूद केले.