मुंबई :
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज तेवीस गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली. हे गावे समाविष्ट करून घेणे बाबत पुढील महिन्यात हरकती व सूचना विभागीय आयुक्तांकडे स्वीकारण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन गाव समाविष्ट करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ नवीन गावांचा समावेश करण्यात येणार असल्याने नवीन गावांच्या समावेशाने आणखी १८४.६१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वाढणार आहे. पुणे शहर हे मुंबई शहरापेक्षा मोठे शहर होणार आहे. पुण्याचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे ३३१.५७ चौरस किलोमीटर असून, पुण्याचा आकार सुमारे ५१६.१८ चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. मुंबई शहरातील क्षेत्रफळ हे सुमारे ४५० किलोमीटर असून, त्यापेक्षा पुण्याचे क्षेत्र हे वाढणार असल्याने पुणे हे आता ‘महापुणे’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या हद्दीत १९९७ मध्ये ३८ गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळीच पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे मुंबईएवढे झाले असते. मात्र, त्यापैकी काही गावे पूर्ण, तर काही अंशत: वगळण्यात आली. तेव्हाही २३ गावांचा समावेश झाल्याने पुण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २५० चौरस किलोमीटर झाले होते. त्यामुळे पुणे हे मुंबईपेक्षा लहानच राहिले होते. त्यानंतर आणखी ३४ गावांचा समावेश पुण्यात करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावेच महापालिकेच्या हद्दीत आली. त्यानंतर पुण्याचे क्षेत्रफळ हे ३३१.५७ चौरस किलोमीटरपर्यंत गेले.
उर्वरित २३ गावे ही टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २६ नोव्हेंबर २०२० रोजी पाठविला असून, राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारकडून अध्यादेश काढला आहे.