अहमदाबाद :
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली वन डे ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे तीन वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने विंडीजची पहिल्या मॅचमध्ये पुरती कोंडी केली. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ ओव्हरमध्ये सर्वबाद १७६ धावा एवढीच मजल मारू शकला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने २८ ओव्हरमध्ये ४ बाद १७८ धावा केल्या. भारताने ६ विकेट आणि २२ ओव्हर राखून मॅच सहज जिंकली. विंडीजच्या चार फलंदाजांना बाद करणारा युझवेंद्र चहल मॅन ऑफ द मॅच झाला.
पहिल्या वन डे मध्ये १७७ धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने विंडीजच्या तुलनेत चांगली फलंदाजी केली. कर्णधार असलेल्या रोहित शर्माने ६०, इशान किशनने २८, विराट कोहलीने ८, रिषभ पंतने ११ (धावचीत), सुर्यकुमार यादवने नाबाद ३४ आणि दीपक हुडाने नाबाद २६ धावा केल्या. विंडीजकडून अल्ज़ारी जोसेफने २ तर अकिल होसिनने १ विकेट घेतली. भारताला विंडीजच्या चुकांमुळे ११ अवांतर धावांचा बोनस मिळाला.
याआधी वेस्ट इंडिजकडून शाई होपने ८, ब्रँडन किंगने १३, डॅरेन ब्राव्होने १८, शमरह ब्रूक्सने १२, निकोलस पूरनने १८, कर्णधार असलेल्या कीरोन पोलार्डने शून्य, जेसन होल्डरने ५७, अकिल होसिनने शून्य, फॅबिनयन अॅलेनने २९, अल्ज़ारी जोसेफने १३, केमार रोचने नाबाद शून्य धावा केल्या. भारताकडून युझवेंद्र चहलने ४, वॉशिंग्टन सुंदरने ३, प्रसिध कृष्णाने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली. विंडीजला भारताच्या चुकांमुळे ८ अवांतर धावा मिळाल्या.