पुणे :
नदी ही जीवनवाहिनी असते, ती प्रवाही असणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांव्दारे नदीचे शुद्धीकरण व्हावे. स्वच्छ नदी प्रदूषण विरहित शहराचे निदर्शक असे मत आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पुढाकारातून आणि पाषाण येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि मॉडर्न कॉलेज गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त पाषाण येथील ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या आणि सुमारे 900 वर्षे जुन्या सोमेश्वर मंदिर परिसरातील जलकुंडाच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन आज आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक निम्हण आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे तसेच नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, ज्योत्स्ना एकबोटे, सनी निम्हण, संदिप खर्डेकर, पोपटराव जाधव, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, सचिन दळवी, लहू बालवडकर, शिवम सुतार, मंदार घुले, गणेश कलापुरे तसेच मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि स्टाफ यावेळी उपस्थित होते. तर अनिल गायकवाड, शैलजा देशपांडे, सुवर्णा भांबूरकरआणि वैशाली पाटकर, शैलेंद्र पटेल आदी मान्यवरांनीउपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उल्हासनगरमधील नदी देखील प्रचंड प्रदूषित झाली होती. त्या नदीत मासे सोडण्यात आले, त्या माश्यांनी त्या नदीतील शेवाळ्या सारखे प्रदूषण कुरतडून नदी स्वच्छ केली. असे आधुनिक उपक्रम रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पात देखील राबविता येणे शक्य आहे. मुळात नदीत प्रदुषित पाणी सोडलेच जाणार नाही इथपासूनच नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पाचा प्रारंभ होतो. रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पात मी माझ्या परीने टप्प्या टप्प्याने सहभागी झालो आहे. स्वच्छता उपक्रम राबविण्यापासून पुस्तक प्रकाशनापर्यंत नानाविविध प्रकल्पांच्या माध्यमातून नदी शुद्धीकरणाच्या दिशेने लोकमानस तयार करणे, लोक चळवळ उभी करणे यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी सोमेश्वरवाडी परिसर आणि या जलकुंडाच्या शुद्धीकरणासाठी चंद्रकांत पाटील यांनी दोन कोटी रूपयांच्या निधीची घोषणा देखील केली.
यावेळी बोलताना आमदार विनायक निम्हण म्हणाले की, ज्या नदीच्या काठावर जलकुंड असते त्याला श्रीक्षेत्राचा दर्जा मिळालेला असतो. सोमेश्वरवाडीतल हे शिव मंदिर देखील सुमारे बाराशे-तेराशे वर्षे पुरातन असून मंदिराला माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेले आहे. या जलकुंडाची झालेली दुर्दशा लवकरात लवकर सुधरावी, यासाठी लोकचळवळ उभी करू.
यावेळी बोलताना वीरेंद्र चित्राव म्हणाले की, या जलकुंडाचे पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करायचे ती स्थिती पुर्ववत होईल, असे आदर्श काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाईल. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श प्रारूप ठरावा आणि या शुद्धीकरणाच्या कामाचा विस्तार होऊन महाराष्ट्रातील देवस्थाने आणि त्या परिसरातील जलकुंडातील पाण्याला तीर्थासारखे पावित्र्य आणि शुद्धता प्राप्त होईल, असे कार्य भविष्यात आम्ही उभे करू, असा मला विश्वास आहे.
यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.