मुंबई :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 20 जुलैला या वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. या शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी परिषदेने तारखेत मुदतवाढ केली आहे.







यामुळे अर्जदार 30 एप्रिल पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरू शकणार आहेत. तर दोन मे पर्यंत याची प्रक्रिया अर्जदारांना पूर्ण करता येणार आहे. याबाबतची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
त्यांनी एक यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख सांगण्यात आली आहे. दर वर्षी ही परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु या वेळेस कोरोना महामारी आणि टीईटी गैरव्यवहार या प्रकरणामुळे परीक्षा उशिरा घेण्यात येत आहे.
यावर्षी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबतची सर्व पूर्वतयारी सरकारकडून करण्यात आली आहे. दरवर्षी या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी बसत असतात. या परीक्षेवर लागलेल्या निकालाच्या आधारावरच विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.








