भारतीय महिला संघाचा श्रीलंका महिला संघावर टी-20 सामन्यात ३४ धावांनी विजय.

0
slider_4552

श्रीलंका :

भारताचा महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना गुरुवारी (२३ जून) दंबूला येथे खेळला गेला.

या सामन्यात दिप्ती शर्मा आणि जेमिमाह रोड्रिगेज यांच्या झटपट खेळी आणि राधा यादव हिच्या कंजूष गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात (India vs Sri Lanka) प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १०४ धावाच करू शकला.

भारताच्या १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १०४ धावाच करू शकला. श्रीलंकेकडून कविशा दिल्हारीने (Kavisha Dilhari) चिवट झुंज दिली. तिने ४९ चेंडू खेळताना ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावा केल्या. परंतु तिला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. तिच्याव्यतिरिक्त श्रीलंकेची एकही फलंदाज २० धावांचा आकडाही गाठू शकली नाही. श्रीलंकेची कर्णधार चमिरा अट्टापट्टूने १६ धावा जोडल्या.

या डावात भारताकडून राधा यादवने (Radha Yadav) सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार आणि शेफाली वर्मा यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूत धाडले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताकडून जेमिमाह रोड्रिगेजने (Jemimah Rodrigues) सर्वाधिक धावा केल्या. २७ चेंडू खेळताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने तिने ३६ धावा केल्या. सलामीवीर शेफाली वर्मानेही ३१ धावा जोडल्या. तसेच दिप्ती शर्मानेही (Deepti Sharma) शेवटच्या षटकात ८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावांची ताबडतोब खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर ३ चौकारांच्या मदतीने २२ धावा करून बाद झाली.

या डावात श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटकात ३० धावा देत तिने भारताच्या ३ फलंदाजांना बाद केले. तसेच ओ रणशिंगे आणि कर्णधार चमिरा अट्टापट्टू यांनीही अनुक्रमे २ व १ विकेट्स घेतल्या.

See also  विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग असणार भारतीयपथकाच ध्वजधारक