पुणे :
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. तक्रारदार यांनी जळगाव पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून तो कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी रात्री कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पाटील हे जळगाव येथे वकील आहेत. तर ते जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर घेऊन गेले.
त्या ठिकाणी त्यांना डांबून ठेवले. यानंतर त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. तक्रारदार यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर जळगाव येथे जाऊन संस्थेत घुसून तोडफोड केली. तर त्यांच्या खिशातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.