बाणेर :
बालेवाडी पोलीस चौकीत नागरिक आणि पोलीस अधिकारी यांच्यात विविध समस्यांवर संवाद बैठक झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी पाषाण रहिवासी संघटना, औंध विकास मंडळ, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन, औंध बाणेर पाषाण एरिया सभा, नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक क्लब, पुणे महिला मंडळ-बाणेर बालेवाडी अध्याय, युनायटेड बालेवाडी ग्रुप यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी परिसरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या यावेळी पोलिसांसमोर मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बार, पब मध्ये वाजणारे जोरात संगीत, बार आणि पब बंद झाल्यानंतर कारमध्ये बसून रस्त्यावर मद्यपान करणारी तरुण मुले आणि मुली, गुंडगिरी, वाईन शॉप समोर खुलेआम दारू पिणे याविषयी चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर नागरिकांनी 100 आणि 112 डायल केल्यावर हिंजवडी पोलीस आणि बालेवाडी पोलीस यांच्यातील सीमा समस्या, आठवडी बाजारातील मोबाईल चोरी, पोलीस स्टेशन स्तरावर भरोसा सारख्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला मदत कक्ष सक्रिय करणे आदी विषय मांडले.
या बाबत नागरिकांना माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, या सर्व गोष्टीत आपण स्वतः लक्ष घालू आणि गरज पडेल तेव्हा डीबी टीमला मदत साठी घेतले जाईल, असे आश्वासन देऊन त्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन असा संवाद आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी गस्त वाढवण्यावर आणि उपद्रव आणि गुंडगिरीला आळा घालण्यावर भर दिला जाईल. स्थानिक रहिवाशांना त्रास देणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर कडक कारवाई केली जाईल.
प्रतिष्ठित आणि सामाजिक सक्रिय नागरिकांचा समावेश असलेल्या ‘शांतता समिती’ ची पुनर्रचना केली जाईल, जी रहिवासी आणि पोलिस यांच्यातील धागा म्हणून काम करेल, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे म्हणाले. त्याचबरोबर नागरिकांसाठी चांगले संवाद आणि मदतीसाठी आय कार्ड देणे आणि ज्येष्ठ नागरिकांची पोलिस ठाण्यात नोंदणी करण्यावरही त्यांनी भर देणार आहे. नाका बंदी वेळोवेळी केली जाईल. रहिवाशांसह मासिक आढावा बैठक आयोजित केली जाईल. बार आणि वाईन शॉप्सवर कडक नजर ठेवण्यासाठी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे लवकरच पोलिस, उत्पादन शुल्क विभाग, पीएमसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी सांगितले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा रहिवाशांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमधील त्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा त्यांचा पूर्वीचा अनुभव नक्कीच उपयोगी पडेल.