मध्यप्रदेश :
रेडर हरजित, यशिका पुजारी, मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या फायनल चे तिकीट मिळवून दिले.
युवा कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर 12 गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने 44-31 अशा फरकाने सेमी फायनल मध्ये एकतर्फी विजय संपादन केला.
या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश निश्चित करता आला. मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांचे मार्गदर्शन आणि निकिताचे कुशल नेतृत्व यातून महाराष्ट्र संघ आता चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात फायनल रंगणार आहे.
फार्मात असलेल्या सुपरस्टार रेडर अजित चौहान, पृथ्वीराज आणि साहिल पाटीलने गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाचा पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित केला.
वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ५०-३७ असा तेरा गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह महाराष्ट्र संघाचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. मात्र महाराष्ट्र संघ आता सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे.