केदारनाथ गौरीकुंड :
केदारनाथ यात्रा मार्गावर गुरुवारी (दि. 3) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास डाट पुलाजवळ गौरीकुंड येथे दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत डोंगराच्या पायथ्याशी असलेली तीन दुकाने वाहून गेली असून तीन दुकाने दरडीखाली गाढली गेली आहेत. यामध्ये 19 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये स्थानिकांसह नेपाळ येथील नागरिकांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बेपत्ता असलेल्या 19 जणांपैकी 12 जणांची ओळख पटली असून त्यातील तीन मृतदेह काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे केदारनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या काही लोकांपैकी काहीजण पाण्यात वाहून गेल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
मंदाकिनी नदीला पूर आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. गौरीकुंड येथे वीर बहादूर आणि सुमित्रा वीरबहादूर (रा. नेपाळ) हे दाम्पत्य ढाबा चालवत होते. त्यांच्या ढाब्यावर दरड कोसळली असल्याने त्यात हे दांपत्य देखील बेपत्ता झाले आहे. त्यांच्यासोबत ढाब्यावर जेवणासाठी आलेले यात्रेकरू देखील बेपत्ता आहेत. गौरीकुंड परिसरात ठराविक अंतराने दरडी कोसळत आहेत.