चिंचवड :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 6) पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ते एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.
हे बदल रविवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील तसेच कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत. महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने महावीर चौकातून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंकरोड येथून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकातून इच्छित स्थळी जातील. रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर चौक अहिंसा चौक बाजूकडे (Chinchwad) जाण्यास बंदी आहे. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.