पुणे :
राजस्थान येथील अजमेर येथे होणाऱ्या उरुसानिमित्त पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे पुणे येथून निघून लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपुर, जयपुर, किशनगढ या स्थानकांवर थांबेल. शेवटचा थांबा मदार स्टेशन हा असेल.
विशेष गाडी क्रमांक 01169 पुणे – अजमेर सुपर फास्ट एक्सप्रेस बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) पुणे येथून रात्री 09.30 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.30 वाजता अजमेर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात विशेष गाडी क्रमांक 01170 मदार जंक्शन – पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस मदार जंक्शन येथून रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) सायंकाळी 07.50 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05.30 वाजता पुणे येथे पोहोचेल.
या गाडीला चार स्लीपर क्लास, 10 एसी थ्री, दोन एसी थ्री इकॉनॉमी आणि तीन जनरल डबे असतील. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
विशेष गाडीचा पुणे आणि परिसरातून अजमेर येथे उरुसासाठी जाणाऱ्या बांधवांना मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी अजमेर येथे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.