मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रक्तदान शिबीर संपन्न; ९५ दात्यांचे रक्तदान…

0
slider_4552

पुणे:

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने ‘घोलप ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर १८७ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती : शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ पुना, कोथरूडचे प्रेसिडेंट गणेश साने, IWC पुणे रिव्हर रिदमच्या प्रेसिडेंट रिचा बंसल आणि IWC जेन झी क्लबच्या समन्वयक डॉ. निवेदिता दास यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे भान देते. एकाच्या रक्तामुळे दुसऱ्याला जीवदान मिळू शकते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांत युवकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे.”

‘घोलप ब्लड बँक’चे हरीदास घोलप यांनी शिबिराचे महत्त्व सांगताना नमूद केले की, “सध्या थॅलेसेमियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यांना सतत रक्ताची आणि प्लेटलेट्सची गरज भासते. अशा शिबीरांमुळे गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना मोठी मदत होते.”

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नियोजन : या शिबिराचा संपूर्ण आराखडा अथर्व दळवी व साहिल वाबिस्कर यांनी तयार केला. संजना दाबके, दिव्या मुंजाळ, राज इंदलकर आणि आर्यन गुनावरे या विद्यार्थ्यांनी शिबिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. कुमोद सपकाळ, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. गोविंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख व सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि NSS टीमचे अभिनंदन केले.

See also  राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी