नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. पण या माहामारीच्या काळात देशवासियांसाठी एक खुशखबर सुद्धा आली आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोनाच्या ‘नेझल’ अर्थात नाकातून घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केली आहे. फेब्रुवारीमध्ये ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने भारत बायोटेकला व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.
सध्या देशात लसीकरणाची मोहीम चालू आहे. पण अजूनही या मोहिमेला पाहिजे तसा टप्पा गाठता आलेला नाही.यामुळे येत्या काळात हे लसीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी कोरोनाच्या नेझल लसीचा फायदा घेता येऊ शकतो. येणाऱ्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालता येईल. या लसीमुळे लसीकरण अधिक सोपे होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या नेझल लसीमुळे येणाऱ्या काळात लसीकरण अजून स्वस्त होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. भारत बायोटेकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. संशोधनानुसार हा सर्वात चांगला पर्याय आहे, असं भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा इल्ला यांनी त्यावेळी सांगितलं होतं.