इराणचे सर्वात मोठे जहाज खर्ग आगीनंतर ओमानच्या खाडीमध्ये बुडाले. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार नौदलाचे हे जहाज वाचविण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2.25 वाजता नौदलाच्या जहाजाला आग लागली होती, तेव्हापासून अग्निशमन दलाच्या जवानांनी सतत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तेहरानच्या दक्षिणेस सुमारे 1,270 कि.मी. अंतरावर झस्क बंदराजवळ ओमानच्या खाडीमध्ये ही घटना घडली.
बुडणाऱ्या नेव्ही जहाजाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटोंमध्ये लाइफजेकेट घातलेले नाविक जहाजावरुन जात आहेत. यासह, फोटोमध्ये जहाजावरील आग आणि धूर देखील पाहू शकता. इराणच्या राज्य वृत्तवाहिन्या खर्गला ‘प्रशिक्षणार्थी जहाज’ म्हणून वर्णन करीत आहेत.




इराणी नौदलात खर्ग जहाजाला खूप महत्त्व होते. दरम्यान, जहाजात आग कशामुळे लागली याची नौदलाचे अधिकारी चौकशी करीत आहेत. याबाबत इराण सरकारने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. खर्ग जहाज बुडणे इराणसाठी मोठा अपघात आहे. सन 2020 मध्ये, इराणच्या लष्करी अभ्यासादरम्यान, एक क्षेपणास्त्र चुकून जस्क बंदराजवळ नौदल जहाजांवर आदळून 19 सैनिक ठार तर 15 सैनिक जखमी झाले होते. त्याच वेळी, वर्ष 2018 मध्ये, इराणी नौदलाचे लढाऊ जहाज कॅस्पियन समुद्रात बुडाले.
इराणची ताकत होते हे जहाज
1) इराणचे मुख्य द्वीप खर्ग यावरून जहाजाचे नाव खर्ग ठेवण्यात आले आहे. इराणच्या नौदलाची ताकद वाढविण्यात ते सक्षम होते. अवजड माल उचलण्यास सक्षम असलेल्या या जहाजातून हेलिकॉप्टरदेखील प्रक्षेपित केले जाऊ शकतात.
2) हे जहाज 1977 मध्ये यूकेमध्ये बनवले गेले होते आणि 1974 मध्ये नौदलात सामील झाले होते. यासाठी इराणला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. सुमारे पाच वर्षे चर्चा झाल्यानंतर इराणला हे जहाज मिळाले.
3) अमेरिकेच्या संस्थेला अंतराळातील उपग्रहाद्वारे जहाजाला लागलेली आग समजली होती. इराणी माध्यमांनी हा अहवाल देण्यापूर्वी त्यांनी हे वृत्त दिले होते.








